अंबरनाथ: नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सलग तिसऱ्या वर्षी विक्रमी करवसुली करून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी नरेंद्र संख्ये आणि कर विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यंदा ९६.७५ टक्के कर वसुली केली आहे. मालमत्ता कराची एकूण मागणी ५१.८१ कोटी इतकी होती. त्यापैकी ५०.१३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यंदाची ही विक्रमी कर वसुली ठरली आहे.
जवळपास तीन महिन्यांपासून कर विभागाचे अधिकारी-कर्मचारी कर वसुलीसाठी विविध ठिकाणी शिबिर आयोजित करून कर वसुली करत होते. तसेच सुट्टीच्या दिवशी देखील कर्मचारी कर वसुलीसाठी कार्यरत होते. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात विक्रमी कर वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले आहे. मार्च महिन्यात थकीत मालमत्ता धारकांवर मुख्याधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता सील करत कारवाई कारवाईचा बडगा उगारल्याने थकीत मालमत्ता वसूल करण्यास मदत झाली आहे.
जवळपास ८० ते ९० थकीत मालमत्ता धारकांची मालमत्ता सील करून कर वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती कर अधिकारी नरेंद्र संख्ये यांनी दिली आहे. कर विभागाने केलेल्या या कार्याचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आज सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.