ठाणे रेल्वे स्थानकात सहा महिन्यात ८३६ चोरीचे गुन्हे

२८९ गुन्हे उघडकीस; २९२ भुरटे गजाआड

ठाणे : जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यांत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ८३६ चोरीच्या तक्रारी ठाणे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. यापैकी २८९ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, या कालावधीत चोरी करणार्‍या २९२ भुरट्यांना जीआरपी पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. त्यामुळे दिवसभर स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे किरकोळ चोर्‍या होण्याचे प्रकार सुरूच असतात. रेल्वेत पाकीट आणि मोबाइल चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात. त्यातही मोबाइल चोरीचे गुन्हे जास्त आहे. गर्दीमध्ये चोरटे अवघ्या काही सेकंदांमध्ये मोबाइल चोरून पसार होतात. त्यामुळे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांवर आहे. शिवाय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीही पोलिसांवर आहे.

ठाणे जीआरपी पोलीस ठाण्यांतर्गत गेल्या तीन वर्षांत मोबाईल, बॅग, सोनसाखळी, लॅपटॉप आणि यांसारख्या इतर ऐवजांच्या चोरीच्या ३ हजार ९१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र, गुन्हे उघड होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असून, २०२१, २०२२ व जून २०२३ पर्यंत १००३ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कालावधीत झालेल्या १००३ आरोपींना जीआरपी पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे.