नमुंमपाने उभारली ८०० कोटींच्या मालमत्ताकर वसुलीची गुढी

नवी मुंबई: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेत मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी ८०० कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या संकल्पाची गुढी उभारली.

२०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटी २९, ३० व ३१ मार्च रोजी गुढीपाडवा व ईद अशा शासकीय सुट्ट्या आल्या होत्या, तथापि सदर दिवशी मालमत्ताकर विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करून मालमत्ताकराच्या वसुलीसाठी प्राधान्य देऊन वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ताकर विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत मालमत्ताकर भरावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने निरनिराळे उपक्रम राबविले. १० मार्च २०२५ पासून थकीत मालमत्ताकरावरील शास्ती रकमेवर ५० टक्क्यांची सूट देणारी ‘अभय’ योजना जाहीर केली. नागरिकांना ऑनलाईन मालमत्ताकर भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन ऑनलाईन मालमत्ताकर संकलन प्रणाली सुरू केली. कर थकबाकी करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटिसा देणे, नळ कनेक्शन बंद करणे, कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या घराबाहेर ढोलताशे वाजून त्यांना कर भरण्यासाठी जागे करणे, विविध समाज माध्यमांच्या उपयोगातून मालमत्ताकर भरण्यासाठी जागृती करणे, प्रसार माध्यमांतून करभरणा करण्याच्या जाहिराती करणे अशा प्रमुख उपक्रमांचा त्यात समावेश होता. नागरिकांसाठी सुट्ट्यांच्या दिवशी विशेष करभरणा केंद्रे (कॅश काऊंटर्स) सुरू ठेवण्यात आले. सुट्ट्यांच्या दिवशीही मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी कर्तव्याला महत्त्व देत करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

२०२५-२०२६ या पुढील आर्थिक वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता करवसुलीचे १२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. नव्या आर्थिक वर्षात मालमत्ताकर संकलनाचे ठरवलेले लक्ष्य नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत नक्कीच गाठेल असा विश्वासही डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.