७८ वर्षांचे आजोबा बारावी उत्तीर्ण

भाईंदर: शिक्षणासाठी वय आडवे येऊ शकत नाही, हे भाईंदर येथील ७८ वर्षांच्या आजोबांनी दाखवून दिले. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परिक्षेचा निकाल लागला. उत्तीर्ण झालेली मुलं आनंद साजरा करत होती. या आंनदोत्सवात एक आजोबाही सहभागी झाले. ७८ वर्षांच्या आजोबांनी १२ वी परीक्षेत ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

गोरखनाथ मोरे असे या आजोबांचे नाव आहे. विशेष म्हणजे हे आजोबा ३२ वर्ष भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील गोरखनाथ मोरे यांचा जन्म १९४७ मध्ये झाला. त्यांनी ११ वीपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांना देशसेवेचे वेड लागले. ३२ वर्षे ते नौदलात नोकरी करत होते. त्या काळात ते कुलाबा येथे राहत होते. १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह भाईंदर येथे रहायला आले. नौदलात लवकर नोकरी लागल्याने त्यांना शिक्षण घेता आले नव्हते. त्यांनी दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले.

मोरे यांना दोन मुले आहेत. मुलगा नितेश मोरे हा देखील भारतीय नेव्हीत कर्तव्यावर आहे. मुलगी आरती ही डॉक्टर असून त्यांचा नांयगाव पश्चिम येथे दवाखाना आहे. नांयगाव येथील ऋषि वाल्मिकी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक रवी भाटकर हे डॉ. आरती मोरे यांच्या दवाखान्यात गेले असताना, वडिलांना पुन्हा पुढील शिक्षण घ्यायचे आहे आणि त्यांना कला शाखेतून बारावीची परीक्षा द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. रवी भाटकर यांनी लगेच त्यांची कागदपत्रे जमा करुन बोर्डात परीक्षा विभागाकडे पाठवून दिली. त्यानंतर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन मार्च २०२५ च्या परीक्षेसाठी बोर्डाकडून परवानगी घेतली. गोरखनाथ मोरे यांनी वसईतील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांना ४५ टक्के मार्क पडले आहेत.