शहापूर तालुक्यातील २८ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
किन्हवली: यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या असून ग्रामीण-आदिवासी भागात पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. शहापूर तालुक्यात ७६हून अधिक गावपाड्यांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली असून सध्या आठ गावे आणि २० आदिवासी पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
शहापूर तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने टँकर व्यवस्था सुरू केली आहे. सद्यस्थितीत आठ गावे व २० आदिवासी पाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून यासाठी १२ टँकर ठेवण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या पाणीटंचाई आराखड्यात शहापूर तालुक्यात १४३ गावे व ३५१ आदिवासी पाड्यांचा समावेश करण्यात आलेला असून ही संख्या ५२५ एवढी आहे. या गाव-पाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४५ लाखांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या ठेकेदारांनाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे.
शहापूर तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई भेडसावत असून भातसा, तानसा, वैतरणा यासह इतर छोटी धरणे तालुक्यात असतानाही पाणीटंचाईची समस्या वर्षानूवर्षे कायम आहे. धरणांच्या तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती शहापूरमध्ये आहे. भावलीसारखी योजना व जिल्हा परिषदेच्या जलजीवन नळ पाणीपुरवठा योजना तालुक्यात मंजूर असतानाही त्या पूर्ण न झाल्याने या वर्षी सुद्धा पाणी पुरवठ्यासाठी टँकर देण्यात आले आहेत. ३ मार्च रोजी एकूण आठ गावे व २० आदिवासी पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून अजून ११ गावे आणि ३७ पाड्यांसाठी टँकरची मागणी झाली आहे.