मीरा-भाईंदर परिवहन सेवेचे ७५ हजार प्रवासी !

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस सेवेमध्ये आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार केलेले अमुलाग्र बदल व सुधारणा यामुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. माहे जून-जुलै २०२२ मध्ये परिवहन सेवेचा एका दिवसात लाभ घेणाऱ्या प्रवासी संख्येचा ७५ हजारचा टप्पा पार केला असून प्रवासी संख्या ८० हजारपर्यंत पोहचली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एका दिवसात प्रवासी संख्येचा ७५ हजारांचा टप्पा पार केल्याने ३ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडलेल्या  महासभेमध्ये परिवहन उपक्रमाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी  महासभेने महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त ढोले, मनपाचे सर्व पदाधिकारी, परिवहन समितीचे आजी-माजी सदस्य, परिवहन समितीचे सभापती यांचेसह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बस ऑपरेटर, सर्व बस चालक, वाहन निरिक्षक, प्रवर्तक व इतर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे ७४ बसचा ताफा उपलब्ध असून दैनंदिन ७० बस प्रवर्तीत केल्या जातात. परिवहन सेवेच्या ९३टक्के बसेस दैनंदिन प्रवर्तीत करण्याचे उद्दिष्टे असून सध्या ९५टक्के बसेस प्रवर्तीत केल्या जातात. तसेच दैनंदिन निश्चित केलेल्या बस फेऱ्यांपैकी ९५टक्के बस फेऱ्या पूर्ण करण्याचे उद्दिष्टे ठरविले असून सध्या ९७टक्के ते ९९टक्के बस फेऱ्या पुर्ण केल्या जात आहेत.

परिवहन उपक्रमाचे बस सेवेमध्ये ४०टक्के व त्यावरील दिव्यांग प्रवाशांना बस तिकीट भाड्यामध्ये १००टक्के सवलत देण्यात येत असून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, जेष्ठ नागरीक यांना ५०टक्के सवलत देण्यात येते. ३ ऑगस्ट रोजीच्या महासभेमध्ये मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांना १००टक्के सवलत देण्यास मान्यता दिलेली आहे.

परिवहन उपक्रमाच्या बसची दैनंदिन स्वच्छता नियमित व सुरळीत बससेवा तसेच प्रवाशांची, शालेय विद्यार्थ्याची आवश्यकता विचारात घेऊन बस सेवेच्या वेळेमध्ये-फेऱ्यां मध्ये केलेल्या सुधारणामुळे परिवहन सेवेवर प्रवाशांचा विश्वास निर्माण झाल्याने प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे. यामुळे मासिक पासची संख्या देखील वाढलेली असून माहे जुन २०२२मध्ये १५२१ व जुलै २०२२ मध्ये २१०५ पास घेण्यात आले आहेत.