जिल्ह्यातील 73 हजार विद्यार्थी चमकणार नव्या गणवेशात

ठाणे : समग्र शिक्षा मोफत गणवेश योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सरकारी शाळांतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी आता नवीन गणवेशात चमकणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील 73 हजार 726 विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात येणार असून यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 2 कोटी 21लाख 17 हजार 800 एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषद शाळांचा शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवून शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागातील समग्र शिक्षा योजनेंतर्गत मोफत गणवेशवाटप सुविधा सुरू करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अंतर्गत सरकारी शाळेतील सर्व मुली व मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल मुलांना गणवेश घेण्यासाठी दरवर्षी रक्कम दिली जाते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक गणवेश घेण्यासाठी प्रत्येकी 300 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.