जिल्ह्यातील आदिवासी विकास उपयोजनेसाठीच्या ७३.४४ कोटी

अमृत आहार योजना, आश्रमशाळांच्या पाणीपुरवठ्यासाठी वाढीव नऊ कोटी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विकास उपयोजनेसाठीच्या ७३.४४ कोटी रुपयांच्या आराखड्यास आणि एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना व आश्रमशाळांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव ९ कोटी अशा ८२.४४ कोटी रुपयांच्या आराखड्यास आज आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी मंजूरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आदिवासी विकास उपयोजनांच्या आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शिंदे यांनी कातकरी समाजासाठी घरकुल योजना आणि विशेष योजना राबविण्याची मागणी केली. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आदिवासी विभागाच्या ज्या निवासी आश्रमशाळांना शाळा इमारत नाही निवाऱ्याखाली (शेडमध्ये) त्या भरतात अशा आश्रमशाळांच्या संकुल बांधकामासाठी निधी देण्याची मागणी केली. शहापूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या बांधकामासाठी ८ कोटी निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, त्याला तातडीने मान्यता देऊन काम सुरू करण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्यातील कातकरी समाजासाठी घरकुल प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना आदिवासी मंत्र्यांनी यावेळी केली. शाळा, वस्ती, पाड्यांना पाणी,वीज पुरवठ्यासाठी विशेष प्राधान्य- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या बाबत अधिक माहिती देतांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले, बैठकीत जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग २६ उपयोजनांसाठी ७३.४४ कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला त्याला मंजूरी देण्यात आली. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी सुमारे सहा कोटी व आश्रमशाळांसाठी पाणीपुरवठा योजनेकरिता सुमारे तीन कोटी अशा वाढीव नऊ कोटी रुपयांना देखील यावेळी मंजुरी देण्यात आली. आराखड्यामध्ये शाळा, वस्ती पाड्यांना पाणी पुरवठा, वीज पुरवठा देण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये एकूण २३ निवासी आश्रमशाळा असून त्यापैकी शहापूर तालुक्यातील आंबिवली, पिवळी, विहीगाव माळ तर भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, पिसे, पिळंझे या सहा ठिकाणी आश्रमशाळा संकुल बांधण्यासाठी अंदाजे ४८ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे, यामध्ये शाळा इमारत, वसतीगृह, अधिक्षक निवास यांच बांधकाम करण्यात येणार आहे. आश्रमशाळा संकुल बांधकाम, घरकुल प्रस्ताव आणि प्रकल्प कार्यालय बांधकाम यासाठी राज्यस्तरावरून स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे, असे आदिवासी विभागाच्या शहापुर प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार यांनी सांगितले.