ठाणे : ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 मे 2024 या दिवशी मतदानादिवशी कर्तव्यावर असल्याकारणाने मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही अशा 691 अधिकारी-कर्मचारी यांनी आज 14 मे रोजी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत आज टपाली मतदान पार पडले. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिले होते, अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात मतदानासाठी जाणे शक्य नाही अशा अधिकारी कर्मचारी यांनी आज टपाली मतदान केले.
टपाली मतदानासाठी एकूण 2949 कर्मचाऱ्यांनी नमुना 12 ड भरुन टपाली मतदानासाठी नोंदणी केली होती. आज सायंकाळी 5 वाजेपर्यत एकूण 69 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. 14 आणि 16 मे असे दोन दिवस टपाली मतदान सुरू राहणार असल्याची माहिती मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.