राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : मराठीमध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाने मारली बाजी, अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तर याच चित्रपटासाठी अजय देवगणलाही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अजय देवगणचा हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटात अजय देवगणने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याशिवाय सायना चित्रपटासाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला.