शून्य मते मिळाल्याचा राज ठाकरे यांचा दावा खोटा
काटई गावातील मतदान यादी सोशल मीडियावर व्हायरल
डोंबिवली : विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना त्यांच्या गावी एकही मत मिळाले नसल्याचा दावा केला. मात्र, त्यांच्या या विधानावर आता स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिवाद केला आहे.
राजू पाटील यांच्या काटई गावातील शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाच्या फॉर्म नंबर 20 मधील अधिकृत माहिती सोशल मीडियावर व्हायरल करत, “राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी पुरवली?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे तर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या मते कल्याण ग्रामीण मतदारसंघातील काटई गावात एकूण 1,470 मतदार आहेत. येथे निवडणुकीसाठी तीन मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, राजू पाटील यांच्या गावात 353 क्रमांकाच्या मतदान केंद्रात राजू पाटील यांना 260 मते राजेश मोरे यांना 183 मते, 354 क्रमांकाच्या मतदान केंद्रात राजू पाटील यांना 269 मते, राजेश मोरे यांना 205 मते तर 355 क्रमांकाच्या मतदान केंद्रात राजू पाटील यांना 154 मते आणि राजेश मोरे यांना 151 मते मिळाली. याप्रमाणे राजू पाटील यांना 683 मते तर राजेश मोरे यांना 539 मते मिळाली. राजू पाटील यांना त्यांच्या गावात 144 मतांची आघाडी मिळाली.
या अधिकृत आकडेवारीनुसार, राजू पाटील यांना त्यांच्या गावातून शून्य मते मिळाली हा राज ठाकरे यांचा दावा चुकीचा ठरतो. ही चुकीची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत कोणी आणि का पोहोचवली? असा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करू लागले आहेत.