गोदामातील भंगार उचलताना चोरले ६८ लॅपटॉप; तिघे जेरबंद

३५ लॅपटॉप हस्तगत

ठाणे : भिवंडीच्या गोदामातील भंगार उचलण्याचे काम दिलेल्या व्यक्तींनीच येथील सुरक्षारक्षकांच्या मदतीने तब्बल ६८ लॅपटॉप चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोणतेही धागेदोरे नसताना नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून ३५ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित मुद्देमालही लवकरच ताब्यात घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

भिवंडीच्या पिंपळगाव येथील जय जलाराम कॉम्प्लेक्समधून ६८ नामांकित कंपनीचे लॅपटॉप अज्ञातांनी चोरून नेले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोणताही पुरावा नसताना पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी तपासाला सुरवात केली. तांत्रिक बाबींचा अभ्यास करत पोलिसांनी राजेंद्र साहू, नासिर खान, अब्दुल्ला मुस्त यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना गोदामातील भंगार उचलण्याचे काम देण्यात आले होते. या कामादरम्यान त्यांनी ६८ लॅपटॉप चोरून नेले. पोलिसांनी त्यांच्याकडील 16 लाख 97 हजार 500 रुपये किंमतीचे ३५ लॅपटॉप हस्तगत केले आहेत. यातील काही लॅपटॉप चोरटयांनी विकले असून त्याचाही शोध घेतला जाईल, असे नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी सांगितले.