नायगावमध्ये ६५ एकर जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश

हजार कोटींची फसवणूक

भाईंदर: नायगाव पूर्व परिसरातील जमिनींच्या व्यवहारात सुरू असलेल्या गैरप्रकारांचे अनेक किस्से याआधीही समोर आले आहेत. मात्र टिवरी भागात उघडकीस आलेल्या तब्बल ६५ एकर जमीन घोटाळ्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.

बनावट कागदपत्रे, रद्द झालेली मुखत्यारपत्रे आणि महसूल यंत्रणेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत हा सुनियोजित घोटाळा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात नामचीन बिल्डर्ससह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिसर येथील एक रहिवासी आणि विकासकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

दाखल तक्रारीनुसार, २००८ पासून नायगाव-टिवरी परिसरातील विविध सर्व्हे क्रमांकांवरील जमिनींच्या व्यवहारात फसवणूक सुरू होती. आरोपी असलेले दोन विकासक यांनी जमिनी विकसित करण्याचे आमिष दाखवून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. या व्यवहारासाठी तक्रारदारांनी मूळ जमीनधारक शेतकऱ्यांना थेट आपल्या बँक खात्यातून मोठी रक्कम दिली होती. मात्र, या पैशांचा वापर करून आरोपींनी जमिनीचे खरेदीखत फिर्यादीच्या नावावर न करता स्वतःच्या तसेच त्यांच्या कंपन्यांच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. ‘डीडीपीएल ग्लोबल प्रा. लि.’ आणि ‘युनिकॉर्न इन्फ्रा अ‍ॅण्ड इस्टेट प्रा. लि.’ या कंपन्यांच्या माध्यमातून हे व्यवहार करण्यात आले. यासाठी कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरलेली आणि अस्तित्वात नसलेली नोटराईज्ड पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी वापरण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या कटात काही सरकारी यंत्रणांचाही गैरवापर झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. दुय्यम निबंधक कार्यालय तसेच महसूल विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी नोंदणी अधिनियमातील कलम ३२ व ३३ ची अंमलबजावणी न करता या व्यवहारांना वाट मोकळी करून दिल्याचा आरोप आहे. सातबारा उताऱ्यावर नोंदी करतानाही महसुली नियमांची पायमल्ली झाल्याचे तपासात समोर आले आहे.

अधिकार नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनींची विक्री करण्यात आली. या ६५.३३ एकर जमिनीचा सध्याचा बाजारभाव सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सखोल चौकशी केली. चौकशीत आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नायगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८(४), ३१६(५), ३१६(२) सह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हायप्रोफाईल जमीन घोटाळ्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे करत असून, या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.