भिवंडीत भीषण आगीत १० गोदामे जळून खाक

भिवंडी: मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घड़ली आहे. या आगीत 10 ते 12 गोदामे जळून खाक झाली आहेत. शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टोरंट पावर या वीज वितरण कंपनीला माहिती दिल्यानंतर त्यांना पोहोचण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीत सुमारे 10 ते 12 गोदाम पूर्णतः जळून खाक झाली असून इमारतींच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यालाही आगीचा मोठा फटका बसला आहे. आगीची तीव्रता लक्षात घेता भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.