कल्याण-डोंबिवलीत ६४० बाधित नागरिक स्थलांतरित

कल्याण: गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहराला चांगलाच तडाखा दिला असून शहरात धुंवाधार पावसामुळे खाडी किनारी पाण्याची पातळी वाढल्याने तसेच शहरातील सखल चाळी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

कल्याण-डोंबिवली शहरातील नदी, खाडी किनारी तसेच गणेश घाट नजिकचा परिसर व सखल भाग आदी ३१ ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर सुमारे २४६ कुटुंबांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. गेल्या २४ तासांत कल्याण तालुक्यामध्ये १८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुरुवारी सकाळी सहापासून दुपारी चार वाजेपर्यंत १०९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहराला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले. पावसाने बुधवारी रात्रीपासून चांगलाच जोर धरल्याने कल्याण पश्चिमेकडील खाडीकिनारी असलेल्या भागांना पावसाचा तडाखा बसला. कल्याण खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने खाडीचे पाणी लगत असलेल्या गोविंदवाडी, रेतीबंदर परिसरातील चाळीमधील घरांमध्ये शिरल्याने या घरातील नागरिकांना त्वरित स्थानिक रहिवाशांनी इतरत्र हलविले. गोविंदवाडी परिसरातील तबेल्यांमध्येही खाडीचे पाणी शिरल्याने तबेल्यातील म्हशींना गोविंदवाडी दुर्गाडी रस्त्यातील दुभाजकावर बांधून ठेवण्यात आले. काळू व उल्हास नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने या दोन्ही नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

कल्याण स्टेशन परिसर, बाजारपेठ, आंबेडकर रोड, शहाड, आडीवली ढोकली तसेच खाडी किनारी असलेले अशोकनगर, वालधुनी, योगिधाम, घोलप नगर, खडेगोळवली, डोंबिवलीतील पलावा, कोपर गाव, आयरे गाव, गरिबाचा पाडा, राजीव नगर, कुंभारखान पाडा आदी सुमारे ३१ ठिकाणी २४६ कुटुंबांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने या घरातील ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून सुमारे साडे सहाशे नागरिकांना फूड पाकीट वाटल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. शहरात अन्य १९ ठिकाणी पाणी साचल्याची तर आधारवाडी येथे झाड पडल्याची तक्रार पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंद करण्यात आली होती.

टिटवाळ्यामध्ये देखील सखल भागात पाणी साचल्याने चाळीच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. टिटवाळा येथील जावईचा पाडा, भालचंद्र नगर, बंदरपाडा, मोहने यादव नगर आदी सखल ठिकाणी देखील पाणी साचले होते.

सिटी पार्क बुडाले

करोडो रुपये खर्च करून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून योगदान परिसरात उभारलेल्या सिटी पार्कला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला आहे. संपूर्ण सिटी पार्क पाण्याखाली गेल्याने कल्याणमधील विरंगुळ्यासाठी असलेले एकमेव सुंदर उद्यान केवळ सहा महिन्यात बेरंग झाले आहे.