कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये दक्षता पथकाची धाड
कल्याण : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने बुधवारी रात्री कुशीनगर एक्स्प्रेसवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट आरक्षण तिकीटांचा पर्दाफाश केला.
दक्षता पथकाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुशीनगर एक्स्प्रेसच्या दोन एसी डब्यांमध्ये 16 डुप्लिकेट तिकिटे आढळून आली, ज्यामध्ये 64 प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला निघालेल्या कुशीनगर एक्स्प्रेसवर दक्षता पथकाने छापा टाकला. एलटीटी ते इगतपुरी दरम्यान एसी कोच B1 आणि B8 मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ताब्यातून 16 डुप्लिकेट तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. या तिकिटांवर 64 प्रवासी प्रवास करत होते. नियमानुसार दक्षता पथकाने संबंधित प्रवाशांकडून एक लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. डुप्लिकेट तत्काळ तिकिटे राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून जारी करण्यात आली होती. ही तिकिटे मुंबईतील भायखळा, कुर्ला आणि गोविंद येथे छापण्यात आली होती.
तपासादरम्यान यातील काही तिकिटे व्हीआयपी कोट्यातूनही कन्फर्म झाल्याचे समोर आले आहे. बनावट तिकिटांसह पकडण्यात आलेले बहुतांश प्रवासी गोरखपूर आणि बस्ती येथे जात होते. याबाबत दक्षता पथकातील अधिकाऱ्याने सांगितले की, उन्हाळ्याच्या सुटीत विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सहज पोहोचता यावे यासाठी रेल्वे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रवाशांनी तिकीट दलालांना बळी पडू नये. सध्या तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारूनही दलाल प्रवाशांना बनावट तिकिटे देत आहेत.