नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना लाभ
मुंबई: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6394.13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 9.721 टी.एम.सी.आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टी.एम.सी. आणि औद्योगिक वापरासाठी 1.859 टी.एम.सी. पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पिण्याच्या पाण्याकरिता पुरविले जाणार आहे. त्यामुळे पाणी वापर आधारित लाभधारक संस्थांची भांडवली खर्चातील हिस्सेदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (33.96 टक्के, 2171.45 कोटी रूपये), नवी मुंबई महानगरपालिका (43.53 टक्के, 2783.37 कोटी रूपये), उल्हासनगर महानगरपालिका (9.56 टक्के, 611.28 कोटी रूपये), अंबरनाथ नगर परिषद (7.07 टक्के, 452.06 कोटी रूपये), बदलापूर नगर परिषद (5.88 टक्के, 375.97 कोटी रूपये) या संस्थांना खर्चातील हिस्सेदारी निश्चित करून देण्यात आली आहे.
हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविण्याकरिता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत लाभदायक स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.