ठाणे स्थानकात आज रात्रीपासून ६२ तासांचा जम्बो ब्लॉक

फलाटांची उंची वाढणार, गर्दीचा ताण कमी होणार

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा ताण कमी होण्यासाठी फलाट क्रमांक ५ आणि ६ ची रुंदी वाढवण्यात येणार असून तब्बल ६२ तासांचा जंबो ब्लॉक उद्या गुरुवार रात्रीपासून घेण्यात येणार आहे. यामुळे उद्यापासून मध्य रेल्वेवर प्रवाशांनी प्रवास टाळला तरच बरा, अशी परिस्थिती आहे.

डाऊन फास्ट लाईन साठी 62 तासांचा तर, अप स्लो लाईनवर 12 तासांचा हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, 1 आणि 2 जूनला सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी सांगितले की, 1 आणि 2 जूनला सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक होणार आहे. सीएसएमटी स्थानकात 10 आणि 11 नंबरच्या फलाटची लांबी वाढवण्यासाठी हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाटाचा विस्तार केल्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील. तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 सर्वात बिझी प्लॅटफॉर्म आहे. या फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील. प्रयत्न असा आहे की, दोन्ही ब्लॉक एकच वेळी घेण्यात यावा, कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल, सीएसएमटी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे, त्यानंतर आता ठाणे स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरु होईल.

किती गाड्या रद्द होणार?

शुक्रवारी, 31 मे रोजी 4 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 187 लोकल रद्द होणार. शनिवारी, 1 जून रोजी, 37 लांब पल्ल्याच्या आणि 534 लोकल रद्द होतील. रविवारी, 2 जून रोजी, 31 मेल एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द असतील.

शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

शुक्रवारी, 31 मे रोजी, 11 लांब पल्ल्याच्या तर 12 लोकल, शनिवार 1 जून रोजी, मेल एक्सप्रेस तर 326 लोकल आणि रविवार 2 जून रोजी 18 मेल एक्सप्रेस आणि 114 लोकल

ठाणे आणि सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकमुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विकेंडसाठी जर गरज नसेल, तर प्रवास करू नका. यावेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल मोठ्या प्रमाणात रद्द असणार आहेत, परिणामी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वेने आसपासच्या महापालिका आणि प्रशासनाला जास्तीत जास्त बस सेवा चालवण्याचे आवाहन केले आहे.