वैशाख पौर्णिमेच्या रात्री आढळले ६१ वन्यजीव

* येऊर जंगलात प्राणीगणना
* सांबर, रानमांजर, सर्प, गरुड, लंगूरचे दर्शन
* बिबट्यांनी दिली हुलकावणी

ठाणे: वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर विभागात वन विभागाने प्राणीगणना केली. यावेळी पाणवठ्यावर आलेल्या मुंगूस, सांबर, लंगूर, रानमांजर, सर्प, गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून ६१ वन्य जीवांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या रात्री एकही बिबट्या पाणवठा किंवा अपेक्षित ठिकाणी न फिरकल्याने त्यांची नोंद घेता आली नाही.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या एकूण १०० चौ. कि.मी. क्षेत्रफळापैकी सुमारे ६० टक्के भाग येऊर जंगलात येतो. या भागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचेही वन विभागाने नमूद केले आहे. तरीही वन्यजीवांचा अस्तित्व टिकून असून त्यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व घडामोडींवर जंगलात प्राणी कोणते आहेत, याची माहिती घेण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येऊरच्या जंगलातील पाणवठ्यावर वन संरक्षक व संचालक अनिता पाटील, उपसंचालक प्रदीप पाटील आणि सहायक वनसंरक्षक करिष्मा कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी-पक्षी गणना झाली असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे यांनी दिली.

या भागात बिबट्यांसह अनेक वन्य प्राणी मुक्तपणे फिरत आहेत. काहीवेळा हे प्राणी भक्ष्याच्या शोधात जंगलाबाहेरही येतात. त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यात संघर्षाची शक्यता निर्माण होते. यावर उपाययोजना म्हणून आम्ही सातत्याने निरीक्षण आणि प्राणीगणना करत आहोत.”येऊर परिसरातील कावेसर, ससूनवघर, चेना, नागला, काशी घोडबंदर आदी ठिकाणी मचाणावर बसून, पाणवठ्यावर येणाऱ्या प्राणी-पक्षी यांची माहिती घेण्यात आली. यावेळी सांबर १, रान मांजर १, रानडुक्कर ३, लंगूर १७, घुबड ७, वटवाघुळ १९, मुंगूस ३, माकड ८, सर्प गरुड १, आदी मिळून ६१ वन्यजीव दिसले आहेत.

वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा ही प्राणीगणनेसाठी योग्य वेळ असते, कारण त्या दिवशी चंद्रप्रकाश जास्त असतो आणि जंगलात प्राण्यांची हालचाल तुलनेत अधिक दिसते. या नैसर्गिक प्रकाशात प्राण्यांचे निरीक्षण सुलभ होते. वन विभागाच्या या उपक्रमामुळे जंगलातील जैवविविधतेची स्थिती समजून घेण्यास मदत होते. यामुळे भविष्यातील संरक्षणाच्या दृष्टीने निर्णय घेणे सोपे होते. विशेषतः बिबट्यांच्या हालचाली, त्यांची संख्या आणि वावराचे क्षेत्र याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे, अशी माहिती उप संचालक प्रदीप पाटील यांनी दिली.

यंदाची प्राणीगणना यशस्वी ठरली असून भविष्यात आणखी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा अभ्यासांना गती देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. येऊरच्या जंगलात अजूनही समृद्ध वन्यजीवन टिकून आहे, हे या गणनेतून अधोरेखित झाले आहे.