वसई-विरार परिवहन सेवेत येणार ६१ इलेक्ट्रिक बस

भाईंदर: शहरातील परिवहन सेवा सुधारण्यासाठी वसई-विरार महापालिकेने राज्य सरकारकडे इलेक्ट्रिक बसेसची मागणी केल्यानुसार लवकरच ६१ नवीन इलेक्ट्रिक बसेस परिवहन सेवेत येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी दिली.

महापालिका परिवहन सेवेतील 32 मार्गांवर केवळ 103 बस धावत आहेत. बसेसची संख्या कमी असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथील ऑटोचालक बसेस नसल्याचा फायदा घेत प्रवाशांकडून जादा भाडे आकारतात. लोकांच्या मागणीनंतर प्रदीर्घ काळानंतर महापालिकेने राज्य सरकारकडे इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली होती, त्याला राज्य सरकारने जवळपास मान्यता दिली आहे. एप्रिलपर्यंत नवीन बसेस येण्याची शक्यता असल्याचे तळेकर यांनी सांगितले. त्याचा फटका ऑटोचालकांना बसणार आहे. बसेसची संख्या कमी असल्याने येथे बेकायदा रिक्षांची संख्या वाढत आहे. नवीन बसेस आल्याने बेकायदा रिक्षांना आळा बसेल, सोबतच वाहतूक कोंडीतूनही दिलासा मिळेल. येत्या काळात याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.