ठाणे स्थानकात १७३१ फुकट्या प्रवाशांकडून सहा लाखांचा दंड

ठाणे : विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातून १७३१ प्रवाशांकडून सहा लाखांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ३ या एका दिवसांत ही मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी ६९ रेल्वे कर्मचाऱ्यांसह १७ रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांचा फौजफाटा ठाणे स्थानकावर तैनात होता.

मध्य रेल्वेचे महत्वाचे आणि वर्दळीचे स्थानक अशी ओळख असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात लांब पाल्यांच्या गाड्यांसह मेल, एक्सप्रेस व सर्वच धीम्या व जलद लोकल थांबतात. तसेच कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई, पनवेलकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. दररोज पाच ते सहा लाख प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असतात. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याचबरोबर जनरल डब्याचे तिकीट असताना फर्स्ट क्लासने प्रवास करणे, साध्या लोकलचे तिकीट असताना एसी लोकलने प्रवास करणे, अपंगांच्या डब्यातून प्रवास करणे असे प्रकार वाढले असून यामुळे नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांनी अशा प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अशा फुकट्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरु केली असून, शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत प्लॅटफॉर्मसह, रेल्वे स्थानकांचे एक्झिट गेट येथे प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान १७३१ प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

या प्रवाशांकडून सहा लाख २६५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ६९ तिकीट तपासनीस व रेल्वे कर्मचाऱ्यांसह १७ रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही तिकीट तपासणी मोहीम पार पाडली.