कल्याण-तळोजा मेट्रोसाठी ५८०० कोटींचे टेंडर 

डोंबिवली : कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या मार्गावरील १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी एमएमआरडीएने टेंडर प्रसिद्ध केले आहे. २०.७५ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी ५,८६५ कोटींचा खर्च येणार आहे. इच्छूक कंपन्यांना २ फेब्रुवारीपर्यंत टेंडर सादर करण्याची मुदत देण्यात आली असून ७ फेब्रुवारी रोजी टेंडर उघडली जाणार आहेत.

कल्याण-तळोजा मेट्रोमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या शहरांतील नागरिकांना व चाकरमानी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रोच्या मार्गावर गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे. निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत असेल, तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजूरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण ही मेट्रो कल्याण येथे जोडली जाणार आहे.निळजेजवळ ती कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार आहे. गायमुख ते मीरा रोड, कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गिकेसाठी सल्लागार म्हणून सिस्ट्रा एस.ए. आणि डी.बी. इंजिनीअरिंग आणि कन्सल्टिंग या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये खर्च केला जाणार आहे.

निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर होत असून शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह खासगी टाउनशिप आकार घेत आहेत. याच भागात बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहणारआहे. मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे असणार आहे  यासाठी  एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपो म्हटले की, कारशेडही आली. यामुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे.एकंदरीत कल्याण, डोंबिवली, शिळ फाटा,नवी मुंबई,पनवेल परिसरातील नागरीकांना या मेट्रोचा फायदा होणार असल्याचे म्हटले जाते.