नाथजल पाणी बाटली किंमतीपेक्षा जादा दरात, चहा-नाश्ता महाग

एस.टी विभाग नियंत्रकांना सूचना

ठाणे : राज्य परिवहनच्या (एस.टी) एकूण 31 बस स्थानकांमधील वाणिज्य आस्थापना परवानाधारक आणि नाथजल पाणी बाटली छापील किंमतीपेक्षा जादा दरात विक्री करत आहेत तसेच एस.टी.च्या अधिकृत खाजगी थांब्यांवर 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी करत नसल्याच्या तक्रारी शासनाकडून व विविध समाज माध्यमांतून तक्रारी होत आहेत. त्यामुळे एस.टी.च्या नियोजन आणि पणन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी ही बाब गंभारपणे घेतली आहे, अशी माहिती एस.टी. महामंडळातील सूत्रांनी दिली.
एस.टीच्या अधिकृत थांब्यांवर 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी जोर धरत आहेत. अधिकृत खासगी हॉटेलचे निवडपत्र विभागाला देताना प्रवाशांना अधिकृत खाजगी हॉटेल मालकाने 30 रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करुन देण्याचे बंधन थांबा मालकाला आहे. विभागाने तसे बंधपत्र हॉटेल मालकाकडून घेतल्यानंतरच अधिकृत थांब्याचा प्रस्ताव संयुक्त समितीच्या मान्यतेस धरुन मान्यता देण्यात येते.

प्रवासीभमुख योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर विभागामार्फत / आगारामार्फत करण्यात येत नाही व निवडलेल्या योजनांची विभागामार्फत / आगारामार्फत दक्षतेने करण्यात येत नाही व निश्चित केलेल्या योजनांची विभाग / आगारामार्फत दक्षतेने कारवाई न करणा-या पर्यवेक्षकांवर आणि अधिका-यांवरही कारवाई किंवा जबाबदारी निश्चित होत नाही, ही खेदाची बाब आहे असे महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आले आहे, अशी माहिती ठाणे एस.टीच्या वरिष्ठ अधिका-याने दिली. ठाणे स्थानकात नाथजलची विक्री होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एस.टी प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर विभागातर्फे किंवा आगारातर्फे होते किंवा कसे होते याची तपासणी वेळोवेळी ठाणे व अन्य विभागांमार्फत दक्षतेने करण्यात यावी. प्रवाशांच्या तक्रारींना वाव मिळू नये यासाठी आवश्यक त्या योजना या विभागाने वेळोवेळी कराव्यात व सुचनांचे काटेकोर पालन करावे, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे.