ठाणे परिवहन सेवेने मागितले ५५२ कोटींचे अनुदान

६९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

ठाणे : ठाणे परिवहन सेवेचा २०२४-२५चा ६९४ कोटी ५६ लाखाचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी गुरुवार ८ फेब्रुवारीला परिवहन सभापती विलास जोशी आणि समिती समोर सादर केला.

यावेळी परिवहन सदस्य मिलिंद मोरे प्रकाश पाटील, नितीन पाटील, विकास पाटील, मोहसीन शेख आदी उपस्थितीत होते. या अर्थसंकल्पात विशेष करून परिवहन कर्मचाऱ्यांची जुनी देणी देणे, इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविणे, परिवहनच्या उत्पन्नात अधिकची भर कशी होईल याला प्राधान्य दिले गेले आहे.

विशेष म्हणजे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दंडात दुपटीने वाढ केली आहे. आता ही दंडाची रक्कम दोनशे रुपये इतकी करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. तर पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून शुन्य उत्सर्जन-प्रदुषण असलेल्या १२३ इलेक्ट्रीक बसच्या जोडीला आगामी दोन वर्षाच्या काळात १८६ इलेक्ट्रिक बस ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ४४६ बस आहेत. परिवहन सेवेकडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून त्यापोटी व इतर थकीत द्यावी लागणारी फरकाच्या रकमेसह एकूण थकीत देणी २३ कोटी २२ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

वाहन दुरुस्ती व निगा देखभालीसाठी नऊ कोटी ४२ लाख तरतूद, डिझेल सिएनजी पोटी २१ कोटी ८५ लाख, पुढील वर्ष भराव्या लागणाऱ्या प्रवासी कर आठ कोटी २० लाख, बालपोषण अधिकारी एक कोटी २० लाख, वाहनांचा विमा दोन कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन प्रशासनाने राज्य सरकारकडे १०० कोटी रुपयांचे अनुदान मागितले आहे. ८६ कोटी कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी तर १४ कोटी नवीन डेपो आणि इतर डागडुजीसाठी असे एकूण १०० कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीमधील जास्तीत जास्त अनुदान पदरात पाडून घेण्याचा विचार प्रशासनाचा आहे. तर महापलिकेकडून देखील ४५२ कोटी ४८ लाखांचे अनुदान मिळावे अशी मागणी आयुक्ताकडे केली आहे. यामध्ये वेतन खर्च, पेन्शन, वैद्यकीय भत्ता, रजा, प्रवास भत्ता, सेवानिवृत्ती, कर्मचारी थकबाकी, पुरवठा दारांची देयके आदींच्या खर्चाचा समावेश आहे. दरम्यान ठाणे परिवहन सेवेचा २०२४-२५चा ६९४ कोटी ५६ लाखाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे.

प्रवासी भाड्यापोटी सध्या अस्तित्वात असलेल्या बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या बस असे मिळून १५८ कोटी ४० लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच जाहीरात, पोलीस ग्रॅन्ट व महापालिकेकडून दिलेल्या सवलती पोटी दिलेले अनुदान हे अपेक्षित उत्पन्नात धरण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरीक ५० टक्के, दिव्यांग १०० टक्के, विद्यार्थी ५० टक्के, ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, स्वांतत्र्य सेनिकांची विधवा पत्नी व सोबत सह प्रवासी, तसेच इतरांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे परिवहनवर ताण पडणार आहे. त्याची भरपाई म्हणून अनुदानातून रक्कम मिळावी यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

एक लाख लोकसंख्येमागे ३० बस अपेक्षित आहेत. त्यानुसार ठाणे शहराची सध्याची २३ लाख लोकसंख्या लक्षात घेतल्यास ठाणेकरांना ७९३ बसची आवश्यकता असल्याचे अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.

ठाण्यात धावणार डबल डेकर बसेस

या वर्षात ठाणे शहरात डबल डेकर बसेस धावणार असून प्राथमिक स्वरूपात २० बसेसची मागणी करण्यात आली आहे. घोडबंदर रोड, कळवा आणि ठाणे स्टेशन परिसरात या डबल डेकर बसेस धावणार असून या मार्गाची चाचपणी करण्यात येणार आहे.