ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढ किंचित वाढली आहे. आज ५५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १०५जण रोगमुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीत सर्वाधिक २९ रुग्णांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती येथे सहा आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये पाच रूग्ण वाढले आहेत. उथळसर आणि कळवा प्रभाग समिती भागात प्रत्येकी तीन रूग्ण सापडले आहेत. प्रत्येकी दोन रुग्ण लोकमान्य-सावरकर नगर आणि वागळे प्रभाग समिती परिसरात नोंदवले गेले आहेत. दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. तीन रुग्णांच्या घरची माहिती मिळू शकली नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १०५जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९०,०९९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१४०जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ८२६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ५५जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ८०,८४९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९२,६२०जण बाधित मिळाले आहेत.