बनावट रेरा नोंदणी करून ५५ बेकायदा इमारती बांधल्या

* विरारमधील विकासकासह पाच जणांना अटक
* कोट्यावधींच्या घोटाळ्याने नागरिक धास्तावले

भाईंदर: सिडको, महापालिका, महसुल, रेरा विभागाचे बनावट दस्तऐवज बनवून ४० सदनिका विकण्यात आल्याचा घोटाळा उघड झाला असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बांधकाम परवानगीच्या ५५ फाईल्ससह अनेक बोगस दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत.

विरारमधील रुद्रांश रियल्टर्सचा विकासक दिलीप बेनवंशी याने जिल्हाधिकारी आणि वसई विरार महापालिकेचे नगररचना उप संचालक यांची बनावट सही, बनावट शिक्के वापरुन बनावट बांधकाम परवानगी तयार करुन रुद्रांश ए आणि रुद्रांश बी ही तळमजला अधिक पाच मजले अशी इमारत उभी केली. त्यासाठी त्याने बनावट बिनशेती परवानगी, बनावट भोगवटा प्रमाणपत्र, बनावट सर्च रिपोर्ट बनवून त्याआधारे रेरा अँथॉरीटीची दिशाभुल करून रेरा नोंदणीही करून घेतली.

या इमारतीतील फ्लॅटही विकताना बेनवंशीने सह दुय्यम निबंधक वर्ग-२ वसई येथे बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे ग्राहकांना ४० नोंदणीकृत दस्त करून घेतले. ही बाब उघड झाल्यावर या अनधिकृत इमारतीला पालिकेने नोटीस बजावून त्यातील सदनिकांना सिल लावले होते. मात्र या मुजोर बिल्डरने सिल तोडून त्या सदनिका नागरिकांना खुल्या करुन दिल्या. त्यामुळे महापालिकेची आणि सदनिका घेणार्‍या नागरीकांची फसवणूक केल्याची तक्रार प्रभाग समिती सी चे प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी विरार पोलीस ठाण्यात नोंदवली.

या प्रकरणी विरार पोलिसांनी रूद्रांश रियल्टर्सचे विकासक, जमिन मालक आणि भागीदार यांचेविरुध्द ९ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता दिलीप बेनवंशी, मच्छिंद्र व्हनमाने, दिलीप अडखळे, प्रशांत पाटील आणि राजेश नाईक यांना अटक करण्यात आली आहे.

या अटकसत्रानंतर पोलीसांनी धाडसत्र सुरु केले. मच्छींद्र व्हनमाने याच्या मयुर इंटरप्रायजेस, रियल इस्टेट एजन्सी कार्यालयातून बनावट परवानग्या, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि रबरी शिक्के जप्त करण्यात आले आहेत. दिलीप अडखळे याच्याकडे जिल्हाधिकारी ठाणे,उप जिल्हाधिकारी,उप संचालक नगर रचना विभाग, ग्रामसेवक, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, दुय्यम निबंधक वसई आणि भिवंडी, एमएमआरडीए, विविध आर्कीटेक्ट, विकासक, डॉक्टर, वकील यांचे ९३ शिक्के, बनावट सीसी बनविण्यासाठी लागणारे वसई विरार महापालिकेचे ६०० लेटरपॅड,सिडकोचे ५०० लेटरहेडही सापडले आहेत. ५५ फाईल्स सापडल्या असून, त्या फाईल्समध्ये विविध विकासकांना बनवून दिलेल्या बनावट बांधकाम परवानग्या, ओसी, नकाशे, ब्ल्यू प्रिंट सापडल्या आहेत. प्रशांत पाटील याच्याकडून रूद्रांश ए आणि रुद्रांश बी या अनधिकृत इमारतीची मूळ बनावट सीसी, मूळ बनावट ओसी, आर्कीटेक्टचा बनावट प्लॅन इत्यादी कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपी राजेश नाईक याच्याकडून बनावट शिक्के बनवण्यासाठी वापरात आणलेली लोखंडी मशीन, डिजीटल टायमर क्रिएटीव्ह मशिन हस्तगत करण्यात आली आहे. या पाच जणांनी संगनमत करुन वसई-विरार महापालिका आणि सिडकोचे सीसी, ओसी, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या एन.ए. परवानग्या, दुय्यम निबंधक कार्यालय वसई यांच्याकडे सादर केलेले दस्त, तहसिलदार कार्यालयाचे जागा गावठाण असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र, सर्च रिपोर्ट, बांधकाम मंजूरसाठी लागणारे विविध शासकीय कार्यालयाचे एकूण ११५ बनावट शिक्के तयार करुन त्या आधारे रेरा अॅथॉरीटीची दिशाभुल करून रेरा नोंदणी करून वसई विरार परिसरात ५५ अनाधिकृत इमारतीचे बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याचे तपासात निषन्न झाले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, उपनिरीक्षक तात्या सावजी, सहाय्यक फौजदार सुरेंद्र शिवदे, दिलीप चव्हाण यांनी ही कारवाई केली. एवढा मोठा सदनिका घोटाळा उघड झाल्यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे धाबे दणाणले असून,वसई-विरारमधील नागरिक ही अनधिकृत इमारतीत आपला फ्लॅट आहे का? अशा भीतीने धास्तावले आहेत.