गहाळ झालेले ५२ मोबाईल तीन महिन्यांत नागरिकांना परत

ठाणे: गहाळ झालेले तब्बल ५२ मोबाईल फोनसंच तीन महिन्यांत संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या चेह-यावर हास्य पसरले.

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यामुळे त्याबाबत तपास सुरु केला होता. त्यामुळे वरिष्ठ ज्ञानेश्वर साबळे यांनी पथक स्थापन करुन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस शिपाई विजय कोळी यांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती तत्काळ सी.ई.आय.आर पोर्टलवर अपडेट करुन सातत्याने त्याचा पाठपुरावा करुन तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने मागील तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण पाच लाख ८८ हजार ५०० रुपये किंमतीचे ५२ गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेतला आहे.

हे मोबाईल संच पूर्व प्रादेशिक विभागाचे (कल्याण) अतिरिक्त आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन (कल्याण) ठाणे शहरचे अतुल झेंंडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोपान नांगरे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील •ाुजबळ, उपनिरीक्षक विकास मडके, हवालदार चित्ते, पोलीस नाईक कांगरे, शिपाई विजय कोळी, शिपाई दीपक थोरात, शिपाई श्रीधर वडगावे यांनी केली आहे.