भाईंदर : केंद्र शासनाच्या अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात विविध कामे सुरू आहेत. या अमृत अभियान अंतर्गत मिराभाईंदर महापालिकेच्या ५१६. ७८ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा प्रकल्पास राज्याच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून मान्यता दिली आहे.
मीरा-भाईंदर शहराची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून एमएमआरडीएकडून सूर्या पाणी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेतून शहराला २१८ एमएलडी पाणी मिळणार आहे. हे पाणी मीरा-भाईंदरच्या हद्दीपर्यंत येणार आहे. सूर्या योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हे २१८ एमएलडी पाणी शहरात आल्यानंतर पाणी साठवण्यासाठी व पाणी वितरित करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नवीन २३ पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) बांधल्या जाणार आहेत. तसेच ३८ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. तर शहरात अंतर्गत जलवितरण वाहिन्या १७७ किलो मीटर इतक्या टाकल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा योजनेची इतर सर्व तांत्रिक कामे, वितरण व्यवस्था आधुनिक पद्धतीने उभारली जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या पाणीपुरवठा प्रकल्पावर ५१६ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यातील केंद्र सरकार ३३ टक्के, राज्य सरकार ३७ टक्के अनुदान देणार आहे. या प्रकल्प खर्चात महापालिका ३० टक्के हिस्सा उचलणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने यामध्ये वित्त आयोगामधून महापालिकेने १२६ कोटींची मागणी केली असून वित्त आयोगाकडे महापालिकेच्या हिश्श्याची तरतूद केली आहे.
या प्रकल्प मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर आता लगेच महापालिका निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे. पुढील दीड महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कामाचा कार्यादेश दिला जाणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्याचा निधी महापालिकेकडे सरकारकडून वर्ग होईल. त्यानंतर या कामाच्या प्रगतीनुसार सरकारकडून निधी टप्प्याटप्याने महापालिकेला वर्ग केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहराची पुढील ३० वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून ही पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. पुढील दीड महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करून या कामाचा शुभारंभ नवीन वर्षात केला जाईल, अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली