मीरा-भाईंदर विधानसभा मतदार संघात ५१.७५ टक्के मतदान

भाईंदर: मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ४९ टक्के मतदान झाले होते. मात्र त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलल्यामुळे यावेळी मतदानात वाढ झाली आहे.

मतदान करण्यासाठी सकाळी ७ पासून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याने मतदारांमध्ये ऊत्साह दिसून आला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान झाले. संध्याकाळ सहा वाजेपर्यंतची आकडेवारी येण्यास रात्री बराच उशिर झाला असल्याने गुरुवारी ५१.७५ टक्के मतदान झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी सुनील भुताळे यांनी जाहीर केले.

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे नरेंद्र मेहता व महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन, मनसेकडून संदीप राणे आणि अपक्ष उमेदवार गीता जैनसह एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात पुरुष दोन लाख ६७,७८५, महिला दोन लाख ४३,०७२ व इतर पाच असे एकूण पाच लाख १०,८६२ मतदार आहेत.

मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह वाढला होता, काही भागात सकाळपासून गर्दी होती, तर काही भागात सकाळी ९ नंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७.२१ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर २९.९५ टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत मतदान झाले होते. त्यानंतर तीन वाजेपर्यंत ३९.१० टक्के मतदान झाले व ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान झाले होते.

सायंकाळचा सहाचा संपूर्ण आकडा येणे रात्रीपर्यंत शक्य झाले नाही. प्रशासनाकडून मतदान वाढीसाठी जनजागृती विविध प्रसार माध्यमातून जनजागृती करण्यात आली त्यात महाविद्यालयै, मॉल व चौक आणि दुकाने तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदारांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारी पत्रे लिहिली. प्रशासनाकडून ८५ टक्के मतदान चिठ्ठयांचे वाटप करण्यात आले. सोसायट्यांमधील मतदान वाढीसाठी अनेक सोसायटी मध्ये जनजागृती करण्यात आली. अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांचा मतदानाचा टक्का वाढण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास मदत झाली आहे. मतदार जनजागृतीसह मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी व प्रतीक्षा मंडप सह विविध सोई, सुविधा उपलब्ध करून देण्यांत आल्या होत्या. त्याचबरोबर ज्येष्ठ, दिव्यांग यांना थेट मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. गुरुवारी दुपारी मतदारसंघात ५१.७५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकारी सुनील भुताळे यांनी जाहीर केले.