ठाणे: ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये महिलांना ५० टक्के सूट तर ज्येष्ठांना १०० टक्के सूट देण्याचा निर्णय उद्या बुधवारपासून अमलात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्या सन 2024-25च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून 60 वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या बुधवार 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता सॅटिस पूल, ठाणे रेल्वे स्टेशन येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे तसेच परिवहन समिती सदस्य व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षित महिला, सक्षम महिला या घोषनेनुसार अर्थसंकल्पात नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद केली आहे. तरी परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के मोफत प्रवास, महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत व आसनांची व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.