ठाणे: ठाणे जिल्ह्यात गृहमतदान व टपाली मतदानाद्वारे आतापर्यंत 4,838 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांग व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करुन दिली होती. तसेच अत्यावश्यक सेवेतील व निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणे शक्य होणार नाही, अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यांचे मतदान केंद्र परिघाबाहेर असून तिथे निवडणूका होऊ घातलेल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावला. तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या व निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 940 जणांनी अर्ज दाखल केले होते. यात 85 वर्षावरील मतदारांचा तसेच दिव्यांग मतदारांचा समावेश होता. यापैकी एकूण 895 जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करुन आपले मत नोंदविले. यामध्ये 85 वर्षावरील एकूण 766 मतदारांनी तर 129 दिव्यांग मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय करुन दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाचे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास प्रारंभ झाला असून ही प्रक्रिया 19 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पोलीस दलातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्यांचे मतदान केंद्र परिघाबाहेर असून तिथे निवडणुका होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे आपला हक्क बजावला. तसेच जे कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात आहेत व मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले, आतापर्यत 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 3,943 कर्मचाऱ्यांनी मतदान केले.
20 नोव्हेंबर 2024 या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणे शक्य होणार नाही अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 19 नोव्हेंबर 2024 रोजी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.