ठाणे २ आगाराचे उत्पन्न २३ लाख
ठाणे : शिंदे- फडणवीस संयुक्त सरकारने महाराष्ट्रातील समस्त महिलावर्गांसाठी राज्य परिवहन महामंडळात अर्धे तिकीट देण्याची सुविधा दिल्यानंतर, महिलांचा ओढा एस.टी प्रवासासाठी वाढला आहे. त्यांची ३० मार्च २३ रोजी एकूण संख्या ४७ हजार ५२१ इतकी होती, अशी माहिती परिवहन मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
१७ मार्च २०२३ पासून ते ३० मार्च या कालावधीत एस.टीच्या ठाणे आगार दोनच्या कोषागारात तब्बल उत्पन्न २३ लाख ६,९२१ रुपये जमा झाले आहेत. २३ लाखांचे उत्पन्न मिळाल्याने एस.टीचे अधिकारी हरखुन गेले आहेत.
सर्वाधिक उत्पन्न २७ मार्च २३ रोजी दोन लाख ३२,८०७ रुपये ४० पैसे मिळाले असून, त्या खालोखाल दोन लाख चार हजार ५१९ रुपये, ४० पैसे ३० मार्च २३ रोजी वाहकांच्या बॅगमध्ये जमा झाले.
महामंडळाने महिलांकरीता अर्ध्या तिकीटांची सुविधा १७ मार्च २३ रोजी सुरु केल्यानंतर ठाणे एस.टी.च्या आगार दोनमधून पहिल्याच दिवशी महिलांची संख्या ९८९ इतकीच होती. त्यादिवशीचे उत्पन्न १८ हजार ८२९ रुपये उत्पन्न जमा झाले. दुस-या दिवशी महिला प्रवाशांची संख्या २,७८६ इतकी असल्यामुळे ठाणे दोन आगाराला एक लाख सहा हजार ५६ रुपयांवर समाधान मानावे लागले.
२३ मार्च २३ रोजी महिला प्रवाशांची संख्या तीन हजार ४१९ होती. त्यांच्यामुळे एक लाख ७०,९०९ रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते. २८ मार्च २३ रोजी ४,१४४ महिलांनी प्रवास केल्यामुळे दोन लाख १,४१७ रुपये आणि ३० मार्च २३ रोजी ४,१७४ महिलांनी प्रवास केल्याने दोन लाख ४,५१९ रुपये जमा झाले होते, अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.