भिवंडी: गुन्हे शाखा घटक २ च्या पोलिस पथकाने बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून सहा जणांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांच्या भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्यही जप्त केले आहे. सुरज शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर उर्फ विकी, शेखर बत्तीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील अवचित पाडा येथील मकदुमीया कॅफेजवळ काही इसम बनावट नोटा देऊन खऱ्या नोटा घेण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार यांच्यासह पोलिस पथकाने ३ मे रोजी सापळा रचून सुरज, भरत आणि स्वप्नील या तिघांना झडप घालून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून ५०० च्या बनावट नोटांचे एकूण ६० बंडल त्यामध्ये प्रत्येकी १०० नोटा असे एकूण ३० लाख रुपये जप्त करण्यात आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता रामदास, विजय व शेखर या तिघांसोबत मिळून बनावट नोटा तयार करीत असल्याचे उघडकीस आले. त्या तिघा साथीदारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापर केलेला लॅपटॉप, प्रिंटर, बनावट नोटांचे खऱ्या नोटांच्या मापात कटींग करण्यासाठी वापरलेले कटर, नोटा छापण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर व १५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटांसह साहित्य जप्त केले आहे. या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीकडून ४५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलिस उप निरीक्षक श्रीराज माळी, रविंद्र पाटील, सहायक उप निरीक्षक राजेश शिंदे, सुधाकर चौधरी, पोलिस हवालदार सुदेश घाग, प्रकाश पाटील, साबीर शेख, सुनिल साळुंखे, प्रशांत राणे, राजेश गावडे, किशोर थोरात, निलेश बोरसे, सचिन जाधव, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, दक्षता सुतार, महिला पोलीस नाईक सायली गंभेरा, पोलिस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार आदीं पोलिस पथकाने केली आहे.