भाईंदर: ऑनलाईन ॲपद्वारे खरेदी केलेले शेअर परस्पर विकून ४३ लाख ४६ हजारांचा फटका भाईंदर पश्चिमेला राहणाऱ्या शिक्षिकेला बसला आहे. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीनुसार भाईंदर पोलीस ठाण्यात ऑनलाइन गंडविणाऱ्या १० व्हाटसॲप ग्रुप ॲडमिनसह पाच बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या १५० फुटी मार्गावर डीमार्टजवळ ‘स्वर्ग हाईट्स’ या इमारतीत राहणाऱ्या शिक्षिका शीतल जोशी या ४७ वर्षीय शिक्षिकेने फेसबुकवर एका जाहिरातीमध्ये ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी जॉईन व्हा, असे पाहिले. त्यांना ८३ मेंबर असलेल्या व्हाटसॲप ग्रुपवर जॉईन करण्यात आले. त्यानंतर त्यातील ॲडमिन जेसीका यांनी पर्सनल चॅट करत वेगळा ग्रुप बनवून त्यात शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यावरून त्यांनी शेअर खरेदी-विक्रीसाठी एक ॲप डाउनलोड केला होता. त्यांना त्यासाठी एक कोड येत असे व तो कोड टाकल्यानंतर त्या शेअर खरेदी करत असत. वैयक्तिकरित्या उघडलेल्या त्या ग्रुपमध्ये कोणते शेअर खरेदी करायचे आदी माहिती त्यांना दिली जात होती. त्यानुसार जोशी यांनी शेअर खरेदी केले व विकलेसुद्धा. मात्र त्यांना त्या ॲपमधून पैसे काही परत मिळत नव्हते. त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली.
शिक्षिका जोशी यांची ९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान त्यांनी त्यांचे गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता त्यांना कर म्हणून ३० लाख भरावे लागतील असे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत, पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. जोशी यांची रक्कम सुमारे १५ बँक खात्यांत परस्पर वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.