मालमत्ता कर विभागाची माहिती
आनंद कांबळे/ठाणे
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ४२ कोटी २५ लाखांची वसुली फक्त दंडातून मिळाली असून वेळेवर कर भरणाऱ्या ठाणेकरांना महापालिकेने तीन कोटीची सूट दिली आहे.
महापालिका पहिल्या सहा महिन्यांत मालमत्ता कराचे बिल भरणाऱ्या ठाणेकरांना सामान्य करावर दहा टक्के सूट दिली जाते तर सहा महिन्यानंतर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्याला दहा टक्के इतका दंड भरावा लागतो. महापालिकेचे सुमारे साडे सहा लाख करदाते आहेत. त्यांना एप्रिल महिन्यात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने देयक पाठविल्यानंतर १ एप्रिल ते १५ जून दरम्यान कर भरणाऱ्याला १०टक्के, १६ जून ते ३० जून दरम्यान कर भरणाऱ्याला चार टक्के, १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत तीन टक्के, १ ऑगस्ट ३१ मध्ये दोन टक्के सूट दिली जाते. ऑक्टोबरपासून कर भरणाऱ्या करदात्याला मात्र दंड भरावा लागतो.
महापालिकेच्या कर विभागाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आठशे कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापेक्षा जास्त म्हणजे ८१० कोटी इतकी विक्रमी वसुली या विभागाने केली असून त्यामध्ये दंडाची रक्कम ही ४२ कोटी २५ लाख इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी दिली. प्रामाणिक करदाते जर वेळेत कर भरतात तर त्यांना सूट मिळते, त्यामुळेच मागिल तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत तीन कोटीपेक्षा जास्त कर जमा झाला आहे. ठाणेकर करदात्यांनी वेळेवर कर भरून महापालिकेच्या नागरी सुविधा देण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राव यांनी केले आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ऑनलाईन मालमत्ता कर विभागाचे देयक करदात्यांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या ३०टक्के करदात्यांनी मागिल वर्षी ऑनलाईन कर भरला होता. यावर्षी देखिल हे करदाते वेळेत कर भरून महापालिकेला सहकार्य करतील, अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी व्यक्त केली आहे.