ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठेवीत 407 कोटींची वाढ

कर्जातही 488 कोटींची वाढ

ठाणे : ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठेवीत 407 कोटींची लक्षणीय वाढ होत असताना, कर्जात 488 कोटींचीही वाढ होत आहे. या वर्षीचा बँकेचा ढोबळ नफा रुपये २९१ कोटी आणि निव्वळ नफा रुपये १७३ कोटी इतका झाला आहे. बँकेचा स्वनिधी रुपये १,५४९ कोटी इतका आहे.

या पार्श्वभमीवर मूलभूत बँकिंगसह ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन काही नवीन बँकिंग सेवा (प्रॉडक्ट) विकसित केल्या जाणार आहेत. बँकेचा होणारा विस्तार लक्षात घेऊन गुणात्मक मनुष्यबळ विकासावर विशेष लक्ष दिले जाईल व बँकिंग सर्वांसाठी यावर भर दिला जाईल, असे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी रविवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी सांगितले. अन्य सहकारी बँकांशी आमची स्पर्धा नसून आमच्याशीच आहे, असेही त्यांनी यावेळअधोरेखित केले.
पत्रकार परिषेदला टीजेएसबी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंगवी यांच्यासह संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे लेखापरिक्षित आर्थिक निकाल 10 एप्रिलपूर्वी घोषित केरण्याची आपलीं परंपरा बँकेने या वर्षीही राखली. ९ एप्रिल २०२३ रोजी लेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कोरोनाच्या जागतिक आपत्तीनंतरचे संपूर्ण वर्ष आर्थिक बाबतीत आंतरराष्ट्रीय घडामोडीने व्यापलेले होते. या पार्श्वभमीवर बँकेने सर्व निकष दरवर्षीप्रमाणे यशस्वीरीत्या पूर्ण केले व आत्तापर्यंतचा सर्वोच्च ढोबळ आणि निव्वळ नफा नोंदवला आहे.

सन २२- २०२३ या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवीत ४०७ कोटी रुपयांची वाढ तर, कर्जात रुपये ४८८ कोटींची वाढ झाली आणि ३१ मार्च २०२३ रोजी ठेवी रुपये १३,७४३ कोटी तसेच कर्ज पुरवठा ७,२११ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेच्या अनुत्पादित कजार्चे ढोबळ प्रमाण ३.९९ टक्के तर अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण शून्य टक्के आहे, अशी माहिती श्री. गांगल यांनी दिली.

बँकेने आपल्या नफ्याच्या सर्वोच्च कामगिरीची नोंद केली आहे. बँकिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा, आधुनिक तंत्रज्ञान सेवेविषयीच्या ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि डिजिटल बँकिंगकडे वाढणारा कल लक्षात घेऊन बँक टीसीएसच्या सहकार्याने बँकेची सीबीएस प्रणाली लवकरच कार्यान्वित करणार आहे, असे ते म्हणाले. या नव्या अद्ययावत सीबीएस प्रणालीमुळे बँकिंग सेवा अधिक गतिमान होईल. पुढील वर्षी बँकेचा शाखाविस्तार करण्याची योजना आहे. या नव्या शाखा विस्तारातून समाजातील विविध घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविल्या जातील.

बँकेच्या लक्षणीय नफ्यातील वाढ ही प्रामुख्याने संचालक मंडळाच्या व्यवसायिक दृष्टिकोनासह व्याजदराचे योग्य नियमन, वसुलीचे प्रभावी व्यवस्थापन आणि अधिकारी-कर्मचारी यांचा समर्पित भाव यामुळे शक्य झाले आहे, असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे म्हणाले.

सर्वसमावेशक धोरणातून अंत्योदय हे तत्व बँकेने जपले आहे. ‘आरबीआय’सुधारणा करत असून त्यांच्या धोरणानुसार बँकेने रक्कम रुपये एक कोटी आणि त्यापेक्षा कमी रकमेची कर्ज वितरित करण्यावर भर दिला आहे. यातून सर्व सामान्यांच्या आर्थिक सबलीकरणाकडे विशेष लक्ष पुरवले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचा दैनंदिन बँकिंग कामात समावेश करून घेतला आहे. आरबीआय आणि नव्याने सुरु केलेले केंद्रीय सहकार खाते यातून सहकार क्षेत्रात नवे बदल अपेक्षित आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील वाटचाल करण्यासाठी बँक सज्ज असल्याचेही साठे यांनी सांगितले. महाराष्ट्रात बँकेच्या 93 शाखा असून खातेदारांची संख्या 12 लाखांहून आहे, असे सांगण्यात आले.