ठाणे महापालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प
ठाणे: पालिका निवडणुकांचे वर्ष असल्याने यावर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प उद्या ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव सादर करणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ ३०० ते ४०० कोटींची वाढ होण्याची शक्यता असून महसुली खर्च वाढल्याने भांडवली खर्चावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गेल्या वर्षी २०२४-२५ चा ५०२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर सादर केला होता. यात महिला सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था मजबुत करण्यावर भर देण्यात आला होता. कोणतीही करवाढ व दरवाढ नाही, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चात वित्तीय शिस्त, महिला, जेष्ठ नागरीक व युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर, भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामाकाजात पारदर्शकता, कामांचा दर्जा उत्तम राहण्यावर भर आदी प्रमुख उद्दिष्ट्ये या अर्थसंकल्पात घेण्यात आली होती. यावर्षी महापालिका आयुक्त सौरभ राव उद्या अर्थसंकल्प जाहीर करणार असून या अर्थसंकल्पातही अनावश्यक खर्चांवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग तसेच महापालिकेच्या अनेक सेवा या खाजगी एजन्सीच्या माध्यमातून देण्यात येण्यात असल्याने त्यांना दिले जाणारे वेतन यामुळे कोट्यवधींचा आर्थिक बोजा हा ठाणे महापालिकेवर पडला आहे. परिणामी भांडवली खर्चावर जास्त खर्च होण्याऐवजी महसुली खर्च जास्त होत असल्याने याचा परिणाम नागरिक विकास कामांवर देखील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महत्वाची भांडवली खर्चातून होत असलेली कामे ही शासनाच्या निधीच्या माध्यमातूनच होत असल्याने आजही ठाणे महापालिकेला शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
महापालिकेवर १२०० कोटींचे दायित्व
चार ते पाच वर्षांपूर्वी सुमारे चार हजार कोटींपेक्षा अधिक दायित्व असलेल्या ठाणे महापालिकेने दायित्वाचा डोंगर कमी केला असून हे दायित्व आता १२०० कोटींवर आले आहे. मात्र हे दायित्व फेडण्यासाठी ठाणे महापालिकेला आणखी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची चिन्हे असून निव्वळ शासनाच्या निधीवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिकेवर कर्ज काढण्याची वेळ येण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेवर भर देण्यात आला असून सर्वसामान्य ठाणेकरांना आरोग्यसेवा मोफत कशी देता येईल यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. मोतीबिंदूचे आजार मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे सर्वसामान्य माणसाला परवडत नसल्याने ही शस्त्रक्रिया मोफत देण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
सुरुवातीपासूनच पिछाडीवर असलेली ठाणे महापालिकेची पाणीपट्टी ३ मार्च २०२५ पर्यंत अवघी ४७ टक्केच झाली आहे. २२५ कोटी ४८ लाखांचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले होते. यापैकी केवळ १०७ कोटी २२ लाखांची पाणीपट्टीची वसुली झाली असून ही वसुली केवळ ४७ टक्के असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
मालमत्ता विभागाने समाधानकारक वसुली केली असून ५ मार्च २०२५ पर्यंत मालमत्ता कराची वसुली ही ८१ टक्के झाली आहे. मालमत्ता विभागाला यावर्षी ८५४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ५ मार्चपर्यंत मालमत्ता विभागाने ६९२ कोटींची मालमत्ता कराची वसुली केली आहे ही वसुली ८१ टक्के एवढी आहे.
प्रभाग समितीनिहाय मालमत्ता वसुली
प्रभाग समिती वसुली (कोटींमध्ये)
उथळसर ४६.७५
नौपाडा-कोपरी ९१.४४
कळवा २६.३१
मुंब्रा २७.८६
दिवा ३२.४१
वागळे २९.४६
लोकमान्य २६.६८
वर्तक ११४.५
माजिवडा-मानपाडा २१९.७१
एकूण वसुली ६९२.४२