ठाण्यात चार महिन्यांत हिट अ‍ॅण्ड रनचे ३६ बळी

ठाणे : पुण्यातील दुर्घटनेनंतर ठाण्यातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असताना गेल्या चार महिन्यांत ठाण्यात हिट अँड रनचे ३६ बळी गेल्याची बाब उघडकीस आली आहे.

पुण्यात एका अल्पवयीन मुलाने नशेच्या धुंदीत कार चालवून दोघांना चिरडल्याने सर्व शहरांत पोलिस यंत्रणेने कंबर कसली आहे. ठाण्यात मागील चार महिन्यांत हिट अ‍ॅण्ड रनने तब्बल ३६ बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तर १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी बेजबाबदार आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात दीड हजाराच्या आसपास हॉटेल्स, बार, पब्ज आहेत. ठाणे शहरात घोडबंदर रोड, हिरानंदानी मेडोस, कोठारी कंपाऊंड, मानपाडा, निळकंठ रोड, तसेच येऊर येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत हुक्का पार्लर आणि पब चालवले जात आहेत. रात्री उशीरापर्यंत हे अड्डे सुरू असल्याने रात्री झिंगत निघालेले तरुण बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांचा बळी घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ठाणे पोलीस करतात तरी काय? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

कारवाईची भीती कमी मस्ती जास्त
थर्टी फस्ट, गटारी, दिवाळी असो वा अन्य दिवशीही वाहतूक विभागामार्फत नाकाबंदी करत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हला चाप लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण चिरीमिरी द्यायची आणि पुढे जायचे असा समज झाल्याने ही कारवाई कुणी गंभीरपणे घेत नसल्याचेही दिसते. जानेवारी २०२४ पासून वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे नजर टाकली असता तरुणाई मस्तीत धुंद असल्याचे दिसते.
– कारवाईत ड्रक अँण्ड डा्रईव्हनुसार १ हजार ४५ जणांची झिंग पोलिसांनी उतरवली आहे. मात्र त्याचवेळी हिट अ‍ॅण्ड रनच्या २३ घटना समोर आल्या आहेत.
– त्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. जीव गमावलेले बहूतेक तरुण वयाचे असल्याचेही समजते.
– २६ अल्पवयीन वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे.
– वाहन परवाना नसताना देखील गाडी चालवणार्‍या २९५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह आणि इतर केसेस ठाणे पोलिसांकडून दररोज केल्या जातात. दारू पिऊन वाहन चालवणार्‍या मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असते. दारू पिऊन गाडी चालवू नका, असे आवाहन आमच्याकडून नेहमीच केले जाते. अपघात होऊ नये यासाठी आम्ही जेवढी काळजी घेतो तेवढीच नागरिकांनी आणि मुलांच्या पालकांनी देखील घेणे गरजेचे आहे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी केले आहे.