नवी मुंबई : सोमवारी वाशीतील एपीएमसी बाजारात हापूस आंब्याच्या तब्बल ३५,८९५ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात कोकणातील २६,१२६ तर इतर राज्यातील ९७६९ पेट्या अशा एकूण ३५,८९५ पेट्या दाखल झाल्या. मात्र आवक वाढूनही बाजारात दर स्थिर असून ४ ते ६ डझन पेटीचे दर तीन हजार ते सात हजार रुपये आहे.
डिसेंबर महिन्यापासून एपीएमसी फळ बाजारात अंजीर, स्ट्रॉबेरी, हापुस आंबा या फळांचा हंगाम सुरू होत असतो. मात्र यंदा बाजारात देवगडचा हापूस उशिराने दाखल होण्यास सुरुवात झाली. हवामान बदल, कडाक्याची थंडी यामुळे हापूसच्या हंगामाला विलंब झाला आहे. मात्र आता बाजारात हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी एपीएमसीच्या बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या ३५, ८९५ पेट्या दाखल झाल्या आहेत. पेट्या ४ ते ६ डझनाच्या असून तीन हजार ते सात हजार रुपये प्रति पेटी असा आजच्या तारखेस हापूस आंब्याचा दर सुरु आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत सोमवारी बाजारात अधिक दाखल झाल्या आहेत. मात्र आवक वाढली असली तरी हापूसचे दर मात्र स्थिर आहेत. मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जवळ-जवळ एक लाखाच्या घरात पेट्या दाखल होतात.