सिलेंडर फुटल्याने आग लागल्याची घटना
अंबरनाथ : रेल्वे स्टेशन परिसरातील नाट्यगृहाशेजारी असलेल्या झोपडपट्टीमध्ये आज सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये ३५ पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या नाट्यगृहाशेजारी असलेल्या झोपडपट्टीत अचानक आग लागल्याने नागरिक भीतीने घाबरून पळत होते. या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने आग झपाट्याने पसरली व आगीचे धूर आकाशात पसरत होते. यावेळी स्थानिकांनी तात्काळ अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क करून आगीची माहिती दिली. दरम्यान स्थानिक लोकांनी देखील ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. मात्र आग भडकत असल्याने इतर शहरातील आगीचे बंब देखील पाचारण करण्यात आहे. एकूण पाच आगीचे बंब ही आग विझवत होते. काही वेळात ही आग नियंत्रणात आली. मात्र या आगीत ३५ पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.