३४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतात आमने सामने

Photo credits: BSS/AFP

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १८ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात २० ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्यात त्यांच्या मागील सामन्यातील विपरीत निकालांसह उतरतील. ऑस्ट्रेलियाला अखेर या विश्वचषकात यशाचे रहस्य सापडले आहे. त्यांनी लखनौ येथे श्रीलंकेचा पाच विकेट्सनी पराभव करून या विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला तर दुसरीकडे पाकिस्तानला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले, जे या विश्वचषकातील त्यांचे पहिले होते. अहमदाबाद येथे त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून सात गडी राखून पराभव झाला.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी १९७५ ते २०२२ दरम्यान एकमेकांविरुद्ध १०७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ६९ जिंकले आहेत, पाकिस्तानने ३४ जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकली तर पहिले तीन ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर शेवटचे दोन पाकिस्तानने जिंकले.

भारतात, या दोन संघांनी फक्त एक एक दिवसीय सामना खेळला आहे आणि पाकिस्तानने तो सामना जिंकला आहे. हा सामना १९८९ मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न येथे खेळला गेला होता जेव्हा पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा ६६ धावांनी पराभव केला होता. ३४ वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन संघ एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारतात आमनेसामने येणार आहेत. विश्वचषकातील आकडे बघितले तर १९७५ ते २०१९ च्या दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या १० सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने सहा आणि पाकिस्तानने चार जिंकले आहेत.

  ऑस्ट्रेलिया पाकिस्तान
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) ६९ ३४
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (भारतात)
विश्वचषकात (विजय)

 आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला चौथा सामना खेळतील. दोन्ही संघांनी त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात अगदी विरोधाभासी केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले आणि तिसरे जिंकले, तर पाकिस्तानने पहिले दोन सामने जिंकले आणि तिसरा गमावला.

सामना क्रमांक ऑस्ट्रेलिया पाकिस्तान
भारताकडून ६ विकेटने पराभव नेदर्लंड्सचा ८१ धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव
श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव भारताकडून ७ विकेटने पराभव

संघ

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

दुखापती अपडेट्स

ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड विश्वचषकासाठी भारतात आलेला नाही. त्याचा हात अजूनही फ्रॅक्चर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला अनेक समस्या आहेत कारण अनेक खेळाडूंना व्हायरल संसर्ग झाला आहे. सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफीक त्याच्या खोलीत अलग ठेवण्यात आला आहे, तर शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि जमान खान यांना बाधा झाली आहे. याशिवाय, उसामा मीर फ्लूने आजारी असल्याने भारताच्या सामन्यासाठी अनुपलब्ध होता. सुदैवाने पाकिस्तानसाठी, यापैकी एकाही खेळाडूमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून आलेली नाहीत आणि ते ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असतील अशी अपेक्षा आहे.

खेळण्याची परिस्थिती

बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आपला ११ वा एकदिवसीय सामना खेळणार आहे, ज्यामध्ये त्यांनी चार जिंकले आहेत, पाच गमावले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. दुसरीकडे, पाकिस्तान तिसरा सामना खेळेल, ज्यापैकी त्यांनी एक जिंकला आणि एक हरला. पाकिस्तानने येथे आपला शेवटचा एकदिवसीय सामना १९९९ मध्ये खेळला होता.

एम चिन्नास्वामी स्टेडियम, या स्पर्धेतील पहिला सामना आयोजित करेल. आतापर्यंत, येथे २६ एकदिवसीय सामने आयोजित केले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी ११ जिंकले, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने १२ जिंकले, एक सामना टाय झाला आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. हे भारतातील सर्वात लहान मैदानांपैकी एक आहे, त्यामुळे भरपूर चौकार आणि षटकारांसह उच्च स्कोअरिंग सामन्याची अपेक्षा आहे.

हवामान

हवामानात धुके सूर्य दिसण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन १२ % आणि पावसाची शक्यता ४% असेल. पूर्व-ईशान्येकडून वारे वाहतील.

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ऑस्ट्रेलियासाठी, या विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये १०० पेक्षा जास्त धावा करणारा मार्नस लाबूशेन हा एकमेव फलंदाज आहे. त्याने ३८ च्या सरासरीने आणि ६५ च्या स्ट्राईक रेटने ११३ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये, डावखुरा मध्यमगती गोलंदाज मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियासाठी तीन सामन्यांत पाच विकेट्स घेऊन सर्वात यशस्वी ठरला आहे. सध्याच्या संघातील तो विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज देखील आहे.

पाकिस्तानसाठी, त्यांचा यष्टिरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद रिझवान जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याने तीन सामन्यांत १२४ च्या सरासरीने आणि ९४ च्या स्ट्राईक रेटने २४८ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज हसन अलीने तीन सामन्यांत सात विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे. त्याने सातत्यपूर्ण लाईन आणि लेन्थ ठेऊन गोलंदाजी केली आहे ज्याचे फळ त्याला विकेट्सच्या रूपात मिळाले आहे.

आकड्यांचा खेळ

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला एकदिवसीय सामन्यांमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ५९ धावांची गरज

पाकिस्तानचा हसन अली १०० एकदिवसीय विकेट्स पासून २ विकेट्स दूर

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एकदिवसीय सामन्यांमध्ये ६५०० धावा पूर्ण करण्यासाठी ३८ धावांची गरज. वॉर्नर (४) आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके करणाऱ्या रिकी पाँटिंगच्या (५) बरोबरी करण्यापासून एक दूर

ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा १५० एकदिवसीय विकेट्स पासून ३ विकेट्स दूर

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी १०१ धावांची गरज

ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिसला एकदिवसीय सामन्यांमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ७५ धावांची गरज

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनला एकदिवसीय सामन्यांमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ११९ धावांची गरज

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २० ऑक्टोबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)