शेअर मार्केटच्या नावाखाली ३४ लाखांची फसवणूक

ठाणे: ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून ठाण्यातील खोपट येथे राहणाऱ्या 54 वर्षांच्या नोकरदार व्यक्तीची 34 लाख 62 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदार रवीराज साळुंके (54) रा.खोपट, ठाणे यांना 4 ते 10 जुलै 2024 या कालावधीत काही अनोळखी इसमांनी मोबाईलवर संदेश पाठवून ऑनलाईन शेअर मार्केटमधून शेअर्स खरेदी केल्यास अधिक परतावा मिळेल अशी बतावणी केली. त्यानंतर तक्रारदार यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले व त्यांना वारंवार संदेश पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदार यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सागितले. त्यानंतर या ॲपव्दारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे अमिष दाखवून एकुण 34 लाख 62 हजार रूपये ही रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर ही रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंके यांनी या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.