ठाण्यात कोरोनाचे नवीन ३२४ रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ सुरूच असून आज ३२४ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १८१जण रोगमुक्त झाले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीतील कोरोना हॉट स्पॉट असलेल्या माजिवडे मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक १७२ रुग्णांची भर पडली. ४६जण वर्तकनगर, लोकमान्य सावरकरनगर ३०, उथळसर प्रभाग समिती २४, वागळे प्रभाग समिती क्षेत्रात १६, नौपाडा-कोपरी १४ आणि कळवा प्रभाग समिती भागात १३ रुग्णांची वाढ झाली आहे. दिवा प्रभाग समिती येथे चार आणि सर्वात कमी तीन रूग्ण मुंब्रा प्रभाग समितीमध्ये नोंदवले गेले आहेत. दोन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी १८१जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८३,१८० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात १,९४६जणांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,४९६ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ३२४ जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ४६,८०३ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८७,२५७जण बाधित मिळाले आहेत.