ठाणे : खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत होत असून गेल्या दहा महिन्यांत विविध प्रकारच्या तीन हजार ४० शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या ३०४० शस्त्रक्रियांमध्ये २३६७ अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या आहेत. यात एका दोन वर्षीय चिमुरडीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एका महिलेच्या मणक्याची जोखमीची शस्त्रक्रिया तसेच दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या जिल्ह्यातील पहिल्याच यशस्वी शस्त्रक्रियेचा समावेश आहे.
ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी रुग्णालयाचे वागळे इस्टेट येथे मनोरुग्णालयाच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. एका महिन्याला सरासरी ३०० ते ३२५ शस्त्रिक्रिया पार पडत आहेत. जून ते मार्च २०२४ या दहा महिन्यापर्यंत ३०४० रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून, मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. गेल्या १० महिन्यांत केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या एक हजार ६२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सोबतच डोळ्यांच्या ४२४, दंत २२९, अस्थि २०० याबरोबर पोट, कान, नाक, आदींच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियाही सिव्हील रुग्णालयात होतात.
गेल्या नऊ महिन्यात एकूण ३०४० शस्त्रक्रियांपैकी २३६७ अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या आहेत. काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले ह्या जन आरोग्य योजने अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली आहे.