मालमत्ता करवसुली धो-धो ३०० कोटींची वसुली

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने करदात्यांना १० टक्के सवलत दिल्याने आतापर्यंत ३०० कोटी मालमत्ता कर वसुली पूर्ण झाली आहे. ही वसुली गतवर्षापेक्षा नऊटक्क्यांनी वाढली आहे. तसेच यावर्षी दिलेले ७०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचा निर्धार मालमत्ता कर विभागाने केला आहे.

सवलत योजनेत ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सोय पालिकेने उपलब्ध करू दिली होती. ७०० कोटींच्या लक्ष्यापैकी ३०० कोटी म्हणजे ३९ टक्के मालमत्ता कर वसुली १५ जुलैपर्यंत पूर्ण झाली आहे. गतवर्षापेक्षा नऊ टक्के कर वसुली यंदा अधिक आहे. गतवर्षी आतापर्यंत ३० टक्के वसुली करण्यात आली होती. तर यावर्षी दिलेले टार्गेट पूर्ण करण्याचा निर्धार केला असून त्यानुसार बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. त्याचबरोबर यासाठी प्रत्येक शनिवारी दिवसभर मालमत्ता कर वसुली विभाग प्रभाग समितीस्तरावर सुरू ठेवण्यात येणार आल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.

कोपरी, नौपाडा, मुंब्रा, शीळ येथील कर विभाग कार्यालय जुन्या इमारतीमध्ये आहे. त्यातच अन्य कार्यालयाची दुरावस्था झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. हे विभाग तातडीने दुरुस्त व्हावेत, यासाठी वरीष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली.