ठाण्यासह गोठेघर आवाससाठी म्हाडाकडून ३०० कोटी

अर्थसंकल्पात पोलिस वसाहत, वृद्धाश्रम, गोठेघर आवास योजनेचा समावेश

ठाणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात ठाणे शहरातील पोलिस वसाहती, वृद्धाश्रम आणि गोठेघर आवास योजना आदी कामांसाठी सुमारे ३०० कोटींची तरतूद करण्यात आली असून राज्यात १९, ४९७ परवडणारी घरे बांधणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

म्हाडाचा सण २०२४-२५चा सुधारित आणि सन २०२५-२०२६चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२५-२६च्या १५,९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि सन २०२४-२५च्या १०,९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

कोकण मंडळांतर्गतच्या पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी 15 कोटी रुपये, माजिवडे-ठाणे विवेकानंद नगर येथे 100 बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी 30 कोटी रुपये, विरार-बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करण्यासाठी 33.85 कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत इमारतींच्या पुनर्विकास कामासाठी 90 कोटी रुपये, गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी 115 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील पोलिस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीसाठी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आवाज उठवला होता. तर वर्तकनगर येथील पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी देखील त्यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. शहरात कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबांना सुख समाधानाने जगता यावे यासाठी त्यांची घरे उत्तम दर्जाची आणि सोयी सुविधांनी युक्त असावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. अर्थसंकल्पात वर्तकनगर येथील पोलिसांच्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तरतूद केल्याने श्री.केळकर यांनी आभार मानले आहेत.