अनधिकृत इमारतींमुळे शुल्कातून मिळणाऱ्या सुमारे ८०० कोटींवर पाणी
सुरेश सोंडकर/ठाणे
ठाणे शहरात अनधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्याने ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला अधिकृत इमारतींमधून मिळणाऱ्या सुमारे ८०० कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे मत जागरूक नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. यातील सर्वाधिक अंदाजे ३०० कोटींचा फटका एकट्या दिवा प्रभाग समितीमधून बसत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने यंदाच्या चालू आर्थिक वर्षात ५२९ कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात शहर विकास विभागाला ७५० कोटीचे लक्ष्य देण्यात आले होते. परिणामी उरलेल्या सात दिवसात या विभागाला २२० कोटी ६५ लाख रुपये उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्याचे कठीण आव्हान शहर विकास विभागापुढे होते.
शहर विकास विभागाला दरवर्षी उत्पन्नात घट सोसावी लागत असल्याबाबत जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या पाच ते सात मजली अनधिकृत इमारतींची संख्या अंदाजे ६५०च्या पुढे असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींच्या संख्येपैकी अर्ध्या बांधकामांचीही नोंद बीट निरीक्षकांच्या डायरीत नसते. महापालिका हद्दीतील दिवा, मुंब्रा, कळवा आणि माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत इमारतींचे प्रमाण जास्त आहे. एकट्या दिव्यात सर्वाधिक २५० च्या आसपास अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू असून यातून महापालिकेला किमान ३०० कोटींचा फटका बसत आहे.
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला उत्पन्न हे विकास शुल्क, अतिरिक्त भूनिर्देशांक, वाढीव भूनिर्देशांक, छाननी शुल्क,आदीच्या माध्यमातून प्राप्त होते. एखादी पाच किंवा सात मजली अधिकृत इमारत उभारताना महापालिकेला अंदाजे एक ते दीड कोटींचे शुल्क मिळते. मात्र अनधिकृत इमारतींचे पेव फुटल्याने महापालिकेला संपूर्ण शहरातून जवळपास ७०० ते ८०० कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. महापालिका जर अनधिकृत इमारतींवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार नसेल तर संबंधित कायदे आणि अधिकृत इमारतींसाठी नियमावली आदींची गरजच काय? अनधिकृत इमारतीच होणार असतील तर अधिकाऱ्यांची देखील गरज नाही, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी उपस्थित केला आहे.
दिवा प्रकरणी याचिका दाखल होणार!
दिवा पश्चिमेच्या एमटीएनएल ऑफिसजवळ मातोश्री नगर भागात खाडीपात्रात भरणी करुन सात मजली तीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. तर दिवा पश्चिमेच्या खाडीकिनारी उग्रेश्वर मंदिराजवळ असलेल्या गणेश घाट येथे गेल्या वर्षभरापासून अनधिकृतरित्या भरणी सुरू आहे. खारफुटीची बेसुमार कत्तल करून आणि संबंधित भूखंडाला भिंत उभारण्यात आली आहे. खाडीचे नैसर्गिक प्रवाह भूमाफियांनी या ठिकाणी बुजवले असून भविष्यात टोलेजंग इमारती, चाळी उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे भविष्यात दिवागाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. डवले भागात शासकीय जमिनीवर देखील अनेक इमारती बेकायदेशीरपणे सुरू आहेत. याबाबत लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने दिली.