पदवी अभ्यासक्रमांसाठी ३.२८ लाख जागा उपलब्ध

मुंबई: मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीला सुरूवात झाली आहे. यंदा मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात असणाऱ्या विविध पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या ३ लाख २८ हजार ५४४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे.

पारंपारिक अभ्यासक्रम असणाऱ्या बी.ए. अभ्याक्रमासाठी ४१ हजार ३९७, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी १ लाख १ हजार ५४ व स्वायत्त २२ हजार २३८ आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी २४ हजार ५१६ व स्वायत्त ११ हजार २७५ जागा उपलब्ध असतील. गेल्या काही वर्षातील प्रवेश प्रक्रियेनुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील पारंपारिक अभ्यासक्रमांऐवजी स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल पाहायला मिळतो आहे. यंदा बी.ए. मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी ६ हजार ३४०, फिल्म, टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया प्रोडक्शन या अभ्यासक्रमासाठी ५७६, बी.कॉम.

अकाउंट्स अँड फायनान्स १६ हजार ८५ , बी.कॉम. मॅनेजमेंट स्टडीज २४ हजार १९९, बी.कॉम. बँकिंग अँड इन्शुरन्स ६ हजार ४३६, बी.कॉम. फायनॅन्शिअल मार्केट २ हजार २७७, बी.एस्सी. एव्हिएशन ३०० आणि स्वायत्त १८०, बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी १ हजार २३ आणि स्वायत्त १ हजार २९४, बी.एस्सी. संगणकशास्त्र ११ हजार ८०१ आणि स्वायत्त २ हजार ९१०, बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान १७ हजार ६९४ आणि स्वायत्त ४ हजार २६१ जागा उपलब्ध असतील. त्यामुळे यंदाही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित नामांकित महाविद्यालयांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे, हे निश्चित आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ८ मे ते २३ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २७ मे रोजी सकाळी ११ वाजता ‘पहिली गुणवत्ता यादी’ संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून जाहीर होईल. या यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) २८ मे ते ३० मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.