शहापूर शहरासाठी २९.१८ कोटींची पाणीपुरवठा योजना

शहापूरकरांना मिळणार मुबलक व स्वच्छ पाणी

शहापूर : शहापूर शहराचे वाढते नागरिकीकरण लक्षात घेता शहापूर नगरपंचायतीसाठी शासनाने २९.१८ कोटींच्या नवीन योजनेला हिरवा कंदील दिला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सद्यस्थितीत स्थानिक रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी शासनाकडे पाठपुरावा करीत होते.

शहापूरला ग्रामपंचायत अस्तित्वात असताना १९८३ साली माणसी ४० लिटर पाणीवाटप गृहीत धरून योजना बनविण्यात आली होती. या योजनेला आता ३८ वर्षे झाली असून ह्या योजनेतील जलवाहिनीला गळती लागली आहे. योजनेत अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यापासून ही योजना कालबाह्य झाल्याने व शहापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांचा वाढता राबता आहे. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरळीत व पुरेसा होत नसल्याने शहापूरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन योजनेची मागणी करून त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

शहापूरसाठी २९.१८ कोटीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून सन २०५४ पर्यंतची ५८ हजार लोकसंख्या लक्षात घेऊन माणसी १३५ लिटर पाणी मिळेल असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेतून शहापूरकरांना दररोज १०.१५ द.ल.लिटर पाणी मिळणार आहे. येत्या १५ दिवसात या योजनेला तांत्रिक मंजुरी देण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर केले आहे. ह्या योजनेसाठी भातसाचे पाणी आरक्षण करण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत मुंबई येथील ‘मजीप्रा’च्या मध्यवर्ती नियोजन संकल्पचित्र कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.

नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,माजी आमदार पांडुरंग बरोरा व उपनगराध्यक्ष विजय भगत उपस्थित होते.