ठामपातील २७ अधिकारी, कर्मचारी झाले सेवानिवृत्त

ठाणे: महापालिकेच्या सेवेतून २७ अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह सफाई कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शिक्षकांची संख्या आणखी कमी झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन भरती होत नाही. त्यामुळे महापालिकेतील सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढणार आहेे.

ठाणे महापालिकेचे फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन कार्यालयीन अधिक्षक, एक जलनिर्देशक एक मुख्याध्यापक, सात शिक्षकांबरोबरच सहा सफाई कामगार, दोन वाहनचालक, एक माळी, एक बिगारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी मिळून २७ जणांचा समावेश आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत सतराशेहून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. नवीन वर्ष सुरू होताच पहिल्याच महिन्यात २५ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २७ जणांची भर पडली आहे. याचाच अर्थ दोन महिन्यात ५२ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेतील मनुष्यबळ कमी झाले आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता विभागातील कार्यलयीन अधिक्षक महेश आहेर, किशोर कदम महापौर कार्यालयातील प्रवीण प्रधान आदींचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात उपायुक्त मनिष जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांची कुटुंबेही उपस्थित होती.

गेल्या काही महिन्यांत ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात कारभारी निवृत्त झाले आहेत. महिन्याला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेत नवीन भरती देखील रखडली असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त ताण पडत असल्याने पालिका प्रशासन नवीन भरती प्रक्रिया कधी राबवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.